नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. एकूण ६९ पदांकरिता ही परीक्षा होईल. २९ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज  दाखल करता येतील. राज्यसेवा पूर्व परीक्षा यंदा ८ एप्रिल २०१८ ला होणार आहे. स्वाभाविकच जे अधिक जबाबदारीने आणि आधी पासून तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांकरिता अक्षरशः युद्धाचे पडघम वाजायला सुरुवात झालीये. योग्य स्ट्रॅटेजी, भरपूर अभ्यास, जोडीला स्मार्ट वर्क आणि योग्य सराव या चार सूत्रांवरच यशाचे मजले उभे राहू शकतात. परीक्षा पास होण्यासाठी काय करायला पाहिजे याचा आधी विचार करूयात.

भूतकाळापासून बोध घ्या

सर्वप्रथम आपल्या भूतकाळापासून शिका परंतु त्यात अडकून राहू नका. विशेषतः जे पहिल्या प्रयत्नात यश मिळवू शकत नाहीत त्यांनी आपल्या मागच्या प्रयत्नांकडे डोळसपणे बघा. त्या वेळेस कोणत्या चुका झाल्या त्या या वर्षी परत होणार नाहीत याची काळजी घ्या.  गेल्या प्रयत्नात आपण सामान्य ज्ञान आणि CSAT या दोन्ही भागातून किती मार्क मिळवले याचे विश्लेषण करा. या दोन्ही घटकातून तुम्हाला  कोणत्या उपघटकातून कमी मार्क मिळालेत याचंही विश्लेषण करा.

आपले कोणते प्रश्न गेल्या वेळेस चुकलेत? ते का चुकले याचंही विश्लेषण करणं गरजेचं आहे. जे प्रश्न चुकले त्यात आपण अभ्यास केलेले परंतु ऐनवेळेस आठवले नाहीत असे प्रश्न असतील तर आपल्या अभ्यासाच्या प्रक्रियेतच काही चुका होतायत. सामान्यपणे अशावेळी दोन – तीन  प्रतिक्रिया स्वाभाविकपणे समोर येतात.

एक म्हणजे सगळा दोष आयोगावर टाकण्याचा प्रयत्न होतो. MPSC काहीही प्रश्न विचारते! अशा प्रश्नांची उत्तरे कुणालाच येणार नाहीत वगैरे वगैरे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये १० टक्के तरी निदान असे प्रश्न असतातच ज्यांची उत्तरं कुणालाच येत नसतात. परंतु अवघड वाटलेला प्रत्येक प्रश्न या कॅटेगरीत टाकणं चुकीचं. विद्यार्थी आयोगाचीच अक्कल काढायला  लागतात. परंतु असे करून आपला काहीही फायदा होत नाही.

दुसरी प्रतिक्रिया असते म्हणजे थोडक्यात चुकलंय, नाहीतर आलंच  असतं. अशावेळेस थोडक्यात चुकलंय पासून १००% बरोबर आहे पर्यंतचा प्रवास आपल्याला निदान या वर्षी तरी करायलाच हवा. त्यासाठी काही गोष्टी तपासून पहा.

१. ज्या पुस्तकांचा / अथवा नोट्स चा वापर करताय त्यात प्रश्नात अपेक्षित असलेली माहिती आहे ना?

२. आपली रिव्हिजन योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात होते का?

३. आपली अभ्यास पद्धती परीक्षेला पूरक आहे ना?

४. आपला प्रश्न सोडविण्याचा सराव योग्य प्रमाणात आहे ना?

या चारही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील याची काळजी घ्या.

हे विश्लेषण करताना सामान्यपणे आपला फोकस जे आलं नाही याकडेच राहतो आणि जे आले नाही त्यावर अधिकाधिक मेहनत करण्याकडे कल असतो. पण आपली बलस्थानं ओळखून त्याच्या आधारावर सुध्दा यश मिळविता येऊ शकतं. अर्थात त्यासाठी मागील परीक्षेतील आपल्या परफॉर्मन्सचं  सुयोग्य विश्लेषण आवश्यक ठरेल.   आपली बलस्थानं सुरक्षित करून घेतलीत तर त्यातून आलेले प्रश्न हातून सुटणार नाहीत आणि निगेटिव्ह मार्कींगचा फटका बसणार नाही. आपल्या अभ्यासातले जे कच्चे दुवे आहेत त्यांना बळकट करून निदान त्यात सरासरी गुण पडतील याची काळजी घ्या.   Make your strong points strongest and weak points average!

स्पर्धापरीक्षेतील मागील अपयश हे पुढील यशाची पायरी बनायची असेल तर आपला भूतकाळ हा पायरीच्या दगडा प्रमाणे वापरायला हवा. म्हणून जिथे अडलो तिथे गांगरून जाऊन / घाबरून थांबू नका तर पुढे जाण्याचे मार्ग शोधा. यशाचा राजमार्ग त्यातच दडलेला असेल.

यश मिळविण्यासाठी काय करायचेय यावर ही चर्चा अशीच चालू ठेवू तोवर तुमच्या अभ्यासास योग्य दिशा मिळो हीच सदिच्छा!

All the best!!

Sharing is Caring..!