हमखास यशाचा मूलमंत्र ह्या राज्यसेवा पूर्व परीक्षेकरीता चालवत असलेल्या लेख मालेतील हा तिसरा लेख. या लेखात आपण चर्चा करणार आहोत सामान्य ज्ञान आणि CSAT या विषयांच्या स्वरूपाची.

सामान्य ज्ञान या विषयाचा आवाका तसे पाहता खूपच मोठा. इतिहास, भूगोल, राज्यघटना, ग्राम प्रशासन, सामान्य विज्ञान, वाणिज्य, पर्यावरण आणि चालू घडामोडी अशा विविध विषयांचा मिळून सामान्य ज्ञान हा विषय बनतो. कुठल्याही एका विषयाची सखोल माहिती इथे विद्यार्थ्याला माहिती असणे अपेक्षित नसते मात्र वेगवेगळ्या विषयांची जास्तीत जास्त परंतु सामान्य माहिती मात्र त्याच्याकडे असण्याची अपेक्षा असते. या उलट CSAT (कल चाचणी) मध्ये मात्र तुम्ही अपरिचित अशा परिस्थितीतून किती लवकरात लवकर बाहेर येऊ शकता हे तपासून पाहिले जाते. या दोन्ही विषयांच्या हाताळणीत फरक आहे. एकंदर कट ऑफ चा विचार करता CSAT च्या पेपर मध्ये अधिकाधिक गुण मिळविणे गरजेचे आहे कारण सामान्य ज्ञान मध्ये १०० गुण  मिळविणे अवघड आहे परंतु CSAT मध्ये  मात्र १२० – १३० गुण मिळविण्याचा विचार करता येऊ शकतो.

सामान्य ज्ञान मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिलेल्या चार पर्यायांमधून ओळखायचे आहे. सामान्य ज्ञान मध्ये कुठल्याही प्रश्नासाठी ढोबळ विचार केला तर तुम्हाला एकतर उत्तर माहित असते नाहीतर माहिती नसते. म्हणजेच त्यात खरेतर दोनच पर्याय तुमच्या समोर आहे. एकतर माहिती असलेल्या उत्तरावर टिक करणे अथवा प्रश्न सोडून देणे. बऱ्याचदा आपण त्यात तिसरा मार्ग शोधतो अंदाजे उत्तर शोधण्याचा. नक्की उत्तर माहित नसेल तरी सुद्धा योग्य आणि अचूक उत्तरांपर्यंत पोचणे शक्य आहे त्यावर आपण पुढच्या लेखामध्ये चर्चा करू.

उत्तम रिव्हिजन हा हमखास यशाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे परिक्षेला जाण्या अगोदर आपल्या किमान तीन रिव्हिजन होतील या कडे लक्ष द्या. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक ठरेल. अर्थात योग्य नियोजन आत्ता पासूनचे आणि रोजचे करायला हवे. यावरही आपण येत्या काही दिवसात चर्चा करणार आहोत. तूर्तास आपल्याला चांगली रिव्हिजन करायची आहे, एवढी खूणगाठ मनाशी बांधा. एकाच विषयाची १० पुस्तके वाचण्यापेक्षा एकच चांगले पुस्तक १० वेळा वाचले तर अधिक चांगले परिणाम मिळतील यावर विश्वास ठेवा.

CSAT मध्ये मात्र सामान्य ज्ञान पेक्षा वेगळी स्थिती आहे. तिथे तुम्हाला उत्तर आधी माहित असणे गरजेचे नाही तर  उत्तर शोधून काढावे लागते. इथे प्रश्न, तर्क आणि फॉर्म्युले यांच्या साहाय्याने तुम्हाला सोडवायचे आहेत. परीक्षेच्या पॅटर्नचा अभ्यास करून तशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव केला तर कमी वेळेतही ते प्रश्न सहज सोडविता येतील. सामान्य ज्ञान मध्ये मार्क मिळविण्यासाठी पाठांतर, रिव्हिजनची आवश्यकता आहे तर CSAT मध्ये मार्क मिळविण्यासाठी सरावाची जास्त आवश्यकता आहे.

CSAT मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यांची काठिण्य पातळी काय असते यावर विचार करा आणि त्या प्रमाणे CSAT च्या अभ्यासाचे नियोजन करा. CSAT ची तयारी सुरु करतानाच विद्यार्थी गणिताचा बागुलबुवा समोर उभा करतात आणि मग CSAT पेपर कडे बघण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक होऊन जातो. सकारात्मक पद्धतीने आणि ज्ञानावर आधारित विश्लेषणातून CSAT कडे पाहिले तर असे लक्षात येईल की आयोगाचा गणितावर फार भर नाही उलट आकलन क्षमता आणि बुद्धिमत्ता यावर अधिक भर आहे. याही घटकांवर आपण पुढील लेखांमध्ये अधिक सखोल चर्चा करणार आहोत. तूर्तास या विषयाची भीती बाळगण्यापेक्षा त्याच्या सरावावर भर द्या.

याचाच अर्थ असा कि प्रत्येक विषयानुरूप आपल्याला तयारीचा पॅटर्न बदलायला लागेल त्यावर अधिक चर्चा या नंतरच्या लेखांमध्ये आपण करणारच आहोत. हमखास यशाचा मार्ग हा योग्य विश्लेषण आणि त्यानुसार प्रयत्न याच माध्यमातून साध्य करता येतो. आपला परीक्षा पद्धतीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न असाच चालू ठेवू. तोपर्यंत प्रयत्न तुमचे अविरत चालू ठेवा…

शुभेच्छा!!

Sharing is Caring..!