हमखास यशाचा मूलमंत्र ह्या राज्यसेवा पूर्व परीक्षेकरीता चालवत असलेल्या लेख मालेतील दुसरा लेख.

मूलतः परीक्षेचे स्वरूप आणि मागील कट ऑफ यावरून काय बोध घेता येईल याची उहापोह करणारा हा लेख.

परीक्षा पद्धती समजून घ्या

कुठलीही परीक्षा पास व्हायची असेल तर आपल्याला त्या परीक्षेचे मर्म समजून घेणे आवश्यक ठरते. अगदी मूलभूत ढाच्यापासून ते विषयांच्या विश्लेषणापर्यंत. विषयाला सुरुवात करतानाच आधी राज्यसेवा परीक्षेचा ढाचा समजून घेऊ. राज्यसेवा पूर्व परीक्षा ही दोन विषयांची बनली आहे. सामान्य ज्ञान मध्ये १०० प्रश्न आणि २०० गुण आहेत तर CSAT मध्ये ८० प्रश्न आणि २०० गुण आहेत. याचा सरळ अर्थ असा की सामान्य ज्ञान च्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ मार्क आहेत तर CSAT च्या प्रत्येक प्रश्नाला २.५ गुण आहेत. प्रत्येक प्रश्नाला निगेटिव्ह मार्कींग आहे. म्हणजेच प्रत्येक चुकीच्या उत्तराला ३३% मार्क कापले जातील. अर्थात तुमचा CSAT मध्ये एक प्रश्न चुकणं सामान्य ज्ञान मध्ये एक प्रश्न चुकण्यापेक्षा अधिक धोकादायक आहे. याची जाणीव मनात ठेवूनच आपण आपला attempt कुठल्या पेपर मध्ये नक्की किती ठेवायचा हे ठरवायला लागेल.

गेल्या वर्षी कट ऑफ किती होता? 

जो परीक्षेचा सखोल अभ्यास करतो आहे त्याला मागील काही वर्षांचा कट ऑफ काय होता हे नक्कीच माहिती माहिती पाहिजे. राज्य सेवा परीक्षेचा विचार करता मागील तीन वर्षात विविध कॅटेगरी करीता कट ऑफ खालील प्रमाणे होता.

State Services Prelims Cutoff Marks
  Category Subcategory 2015 2016 2017
Open General 125 153 189
1 Females 86 121 168
2 Sports 60 103 146
3 SC General 122 147 173
4 Females 98 135 160
5 ST General 92 119 148
6 Females 74 91 128
7 DT(A) General 109 153 180
8 NT(B) General 115 149 184
9 SBC General 106 153 182
10 NT(C ) General 125 153 189
11 NT(D) General 125 153 189
12 OBC General 125 153 189
13 Females 109 142 174
14 PH Hearing Impairment 100 125 137
15 Locomotor Disability 110 139 154

 

अर्थात यंदाच्या वर्षी आपला attempt किती असावा यासाठी नक्की एक आकडा सांगता येणार नाही. दर वर्षी एकंदर कट ऑफ वाढतो आहे. कट ऑफ वाढण्याची दोन तीन मुख्य कारणे सांगता येतील.

  • एकंदरच परीक्षेच्या तयारीसाठी उत्तम पुस्तके आणि नोटस ची उपलब्धता
  • परीक्षेमध्ये काय विचारले जाईल याचा अंदाज बांधण्यात आलेले यश
  • विद्यार्थ्यांचा योग्य सराव

अजून एक गोष्ट समजून घ्यायला हवी. प्रत्येक परीक्षेचा कट ऑफ काय असेल हे आधी सांगणे अवघड आहे. त्या वर्षी उपलब्ध असलेल्या जागा व त्यानुसार आयोगाकडून पूर्व परीक्षेतून निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या हे एक महत्वाचे परिमाण असेल. आयोगाने साधारण पणे किती विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेत उत्तीर्ण करायचे हे आधीच ठरवलेले असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच केलेल्या घोषणेप्रमाणे हा आकडा १२-१३ एकंदर रिक्त जागांच्या १२-१३ पट असतो. म्हणजे १०० जागांकरिता  १२०० ते १३०० विद्यार्थी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होतील. एकूण जागा कमी असतील तर पूर्व परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी असेल. म्हणजेच त्यावर्षी कट ऑफ जास्त भरेल. यंदा कमी पदे भरली जाणार आहेत म्हणजे कट ऑफ अधिक असण्याची शक्यता आहे. राज्य सेवा यंदाच्या जाहिराती प्रमाणे ६९ रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्थात यात आणखी काही वाढ होण्याची शक्यता आहे   म्हणजेच साधारणपणे अवघ्या १२०० – १३०० उमेदवारांना मुख्य परीक्षेत निवडले जाईल. साहजिकच यंदा कट ऑफ वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. दुसरे महत्वाचे परिमाण म्हणजे परीक्षेची काठीण्य पातळी. ती अधिक असेल तर साहजिकच कट ऑफ कमी येणार. त्यामुळे कट ऑफ अमुक इतका असेल व त्या नुसार माझा attempt अमुक इतका असावा असं गृहीत धरून विद्यार्थ्याने, परीक्षा द्यायच्या आधीच आपला attempt ठरवणं धोकादायक आहे. सचिन तेंडूलकर जसा गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटेपर्यंत कोणता फटका मारायचा हे ठरवत नसे तसाच आपणही प्रश्नपत्रिका हातात येईपर्यंत attempt ठरवू नये.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे परीक्षा सोपी आहे की अवघड हे केवळ आपल्या संदर्भामध्ये न ओळखता इतर स्पर्धकांनाही ही परीक्षा सोपी जाणार आहे की अवघड असा विचार विद्यार्थ्याने करायला हवा. त्यामुळे आपली कामगिरी इतर स्पर्धकांच्या तुलनेत कशी आहे / असेल याचा विचार कायम करत रहाणं विद्यार्थ्यांनी शिकायला हवं. त्यासाठी सराव परीक्षांमध्ये आपल्या कामगिरीचे मूल्यमापन इतरांच्या तुलनेत कसे आहे हे ही तपासून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केवळ वैयक्तिक पातळीवर अभ्यास करून पूर्ण होत नाही.

या बरोबरच इतर अनुभवी स्पर्धक बाजारात उपलब्ध असलेली पुस्तके, सराव परीक्षा यांचा आणि सुयोग्य तंत्राचा वापर करून आपली कामगिरी सुधारत असल्याचे लक्षात घ्यावे लागेल. टी २०  च्या उदयानंतर अनेक खेळाडूंना आपणही प्रसंगी ७-८ च नव्हे तर १० च्या रन रेट ने ही फलंदाजी करू शकतो याचे भान दिले. तसच अनुभवातून शिकणारे विद्यार्थी आपली कामगिरी सुधारत नेत एकंदर कट ऑफ वाढवत नेत असतात याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. स्वाभाविक स्पर्धेचं योग्य भान तुम्हाला अधिक चांगला उमेदवार बनवतं.

केवळ परीक्षार्थी न रहाता तंत्र आणि अभ्यास यात मेल साधत यशाचा मार्ग शोधायचा आपण प्रयत्न करतोय. या लेखमालेतून या संदर्भात अधिकाधिक चर्चा करीत राहू.

भावी यशासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

Sharing is Caring..!