Tag: MPSC rajyaseva 2018

हमखास यशाचा मूलमंत्र | राज्यसेवा २०१८ पूर्व परीक्षा | Blog 4

निगेटिव्ह मार्कींग

मित्र हो, राज्य सेवा परीक्षेला निगेटिव्ह मार्कींग असते. या निगेटिव्ह मार्कींगची मनात एक भीतीही बसलेली असते. निर्णय क्षमतेवरही प्रश्न वगळता सामान्य ज्ञान आणि कल चाचणी या दोन्ही पेपर करता कोणत्याही प्रश्नासाठी चुकीच्या उत्तरावर ३३% मार्क कापले जाणार आहेत.

साहजिकच आपण तर्क शास्त्राच्या आधारे यावर विचार केला तर काही प्रश्न ज्यात आपल्याला दोन पर्यायांपैकी एक पर्याय योग्य उत्तर असेल असे वाटतेय तेथे यश मिळण्याची ५० % शक्यता आहे. आणि जिथे तीन पैकी १ पर्याय योग्य पर्याय असेल तिथे उत्तर अचूक मिळण्याची शक्यता ३३% आहे. ३  प्रश्नांपैकी एक प्रश्न बरोबर आला तरी आपण ३३% अधिक मार्क मिळवू शकतो.

यातून कोणत्या शक्यता निर्माण होतात?

  1. आपल्याला उत्तर अचूक माहिती आहे. म्हणजेच उत्तराचे पूर्ण मार्क मिळण्याची १००% खात्री आहे. आपला attempt किती असावा हे ठरवण्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा आकडा. प्रश्नपत्रिका सोडविताना प्रश्न फेऱ्यांमध्ये सोडवावेत.  पहिल्या फेरीत फक्त १००% खात्री असलेले प्रश्न सोडवावेत. एक फेरी पूर्ण झाली कि आपल्याला ही अंदाज येईल नेमके किती प्रश्न आपल्याला आले आहेत. जर या फेरीमधे समाधानकारक संख्येमध्ये प्रश्न सोडवता आले तर कमी जोखीम घेऊन उर्वरित प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला असा वाटलं मला प्रश्न अवघड जातायत परंतु इतरांना हे प्रश्न सोपे जातील तर मात्र आपल्याला इतर फेऱ्यांमध्ये प्रश्न संख्या वाढवावी लागेल.
  2. उत्तर दोन पर्यायांपैकी एक आहे असे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच उत्तराचे पूर्ण गुण मिळण्याची ५०% शक्यता आहे. सामान्यतः सराव परीक्षांमध्ये अशी परिस्थिती खूपच जास्त वेळा येत असेल तर आपल्याला रिव्हिजन ची आवश्यकता आहे हे समजून घ्या. आणि तसे अभ्यासाचे नियोजन करा. १० प्रश्न असे सोडविले तर स्टॅटिस्टिकस म्हणजेच संख्याशास्त्रानुसार  त्यातील ५ प्रश्न बरोबर यायला हवेत म्हणजेच ५ प्रश्नांचे उत्तर चुकले तरी ३.३३ प्रश्नांचे गन तुम्हाला फायदा मिळवीन देऊ शकतात.
  3. उत्तर तीन पर्यायांपैकी एक आहे (एक पर्याय नक्की उत्तर नाही, असे आपल्याला ठाऊक आहे). म्हणजेच उत्तराचे पूर्ण गुण मिळण्याची शक्यता आता ३३% आहे. १० प्रश्न आपण सोडवले तर संख्याशास्त्रानुसार त्यातले ३. ३३ प्रश्न बरोबर येतील. ६.६६ प्रश्नांवर निगेटिव्ह मार्कींग लागेल. म्हणजेच २ गुणांच्या प्रश्नाला तुम्हाला २. २७ मार्कांचा फायदा होईल. म्हणजेच या पर्यायाचा वापरही करण्यात तुमचा फायदा आहे.
  4. चार पर्यायांपैकी कोणते नक्की उत्तर आहे आपल्याला ठाऊक नाही. अंधारात बाण चालवायचा आहे. अशा ठिकाणी अचूक उत्तर येण्याची शक्यता केवळ २५% आहे. म्हणजे असे तुम्ही बारा प्रश्न सोडविले तर त्यापैकी बारा पैकी ३ प्रश्न बरोबर येतील व नऊ प्रश्न चुकतील. म्हणजेच विशेष फायदा होणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे हे गणित स्टॅटिस्टिकस च्या आधारे मांडलेले आहे. असेच दर वेळेला होईल असे नव्हे. बाराच्या बारा प्रश्न चुकले असे होणार नाही तसंच सर्व च्या सर्व किंवा अगदी त्यापैकी ५०%  प्रश्न ही बरोबर येतील असे होणार नाही. यो दोन्ही टोकांचे भान आपल्याला ठेवावे लागेल. असे असले तरी असे प्रश्न टाळलेलेच बरे असे म्हणायला जागा आहे.

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे हा परिश्रमाबरोबरच स्मार्ट वर्क म्हणजेच तंत्रावर हुकूमत मिळविण्याचा परिणाम असतो. या तंत्रावर हुकूमत मिळविण्यासाठी सुद्धा परिश्रम करावे लागतील. वर दिलेलं विश्लेषण तुमच्या सराव परीक्षेत वापरून पहा त्यानुसार आपले तंत्र घोटवा. यश सहज मिळेल.

All The Best!!

Sharing is Caring..!

हमखास यशाचा मूलमंत्र | राज्यसेवा २०१८ पूर्व परीक्षा | Blog 3

हमखास यशाचा मूलमंत्र ह्या राज्यसेवा पूर्व परीक्षेकरीता चालवत असलेल्या लेख मालेतील हा तिसरा लेख. या लेखात आपण चर्चा करणार आहोत सामान्य ज्ञान आणि CSAT या विषयांच्या स्वरूपाची.

सामान्य ज्ञान या विषयाचा आवाका तसे पाहता खूपच मोठा. इतिहास, भूगोल, राज्यघटना, ग्राम प्रशासन, सामान्य विज्ञान, वाणिज्य, पर्यावरण आणि चालू घडामोडी अशा विविध विषयांचा मिळून सामान्य ज्ञान हा विषय बनतो. कुठल्याही एका विषयाची सखोल माहिती इथे विद्यार्थ्याला माहिती असणे अपेक्षित नसते मात्र वेगवेगळ्या विषयांची जास्तीत जास्त परंतु सामान्य माहिती मात्र त्याच्याकडे असण्याची अपेक्षा असते. या उलट CSAT (कल चाचणी) मध्ये मात्र तुम्ही अपरिचित अशा परिस्थितीतून किती लवकरात लवकर बाहेर येऊ शकता हे तपासून पाहिले जाते. या दोन्ही विषयांच्या हाताळणीत फरक आहे. एकंदर कट ऑफ चा विचार करता CSAT च्या पेपर मध्ये अधिकाधिक गुण मिळविणे गरजेचे आहे कारण सामान्य ज्ञान मध्ये १०० गुण  मिळविणे अवघड आहे परंतु CSAT मध्ये  मात्र १२० – १३० गुण मिळविण्याचा विचार करता येऊ शकतो.

सामान्य ज्ञान मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिलेल्या चार पर्यायांमधून ओळखायचे आहे. सामान्य ज्ञान मध्ये कुठल्याही प्रश्नासाठी ढोबळ विचार केला तर तुम्हाला एकतर उत्तर माहित असते नाहीतर माहिती नसते. म्हणजेच त्यात खरेतर दोनच पर्याय तुमच्या समोर आहे. एकतर माहिती असलेल्या उत्तरावर टिक करणे अथवा प्रश्न सोडून देणे. बऱ्याचदा आपण त्यात तिसरा मार्ग शोधतो अंदाजे उत्तर शोधण्याचा. नक्की उत्तर माहित नसेल तरी सुद्धा योग्य आणि अचूक उत्तरांपर्यंत पोचणे शक्य आहे त्यावर आपण पुढच्या लेखामध्ये चर्चा करू.

उत्तम रिव्हिजन हा हमखास यशाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे परिक्षेला जाण्या अगोदर आपल्या किमान तीन रिव्हिजन होतील या कडे लक्ष द्या. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक ठरेल. अर्थात योग्य नियोजन आत्ता पासूनचे आणि रोजचे करायला हवे. यावरही आपण येत्या काही दिवसात चर्चा करणार आहोत. तूर्तास आपल्याला चांगली रिव्हिजन करायची आहे, एवढी खूणगाठ मनाशी बांधा. एकाच विषयाची १० पुस्तके वाचण्यापेक्षा एकच चांगले पुस्तक १० वेळा वाचले तर अधिक चांगले परिणाम मिळतील यावर विश्वास ठेवा.

CSAT मध्ये मात्र सामान्य ज्ञान पेक्षा वेगळी स्थिती आहे. तिथे तुम्हाला उत्तर आधी माहित असणे गरजेचे नाही तर  उत्तर शोधून काढावे लागते. इथे प्रश्न, तर्क आणि फॉर्म्युले यांच्या साहाय्याने तुम्हाला सोडवायचे आहेत. परीक्षेच्या पॅटर्नचा अभ्यास करून तशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव केला तर कमी वेळेतही ते प्रश्न सहज सोडविता येतील. सामान्य ज्ञान मध्ये मार्क मिळविण्यासाठी पाठांतर, रिव्हिजनची आवश्यकता आहे तर CSAT मध्ये मार्क मिळविण्यासाठी सरावाची जास्त आवश्यकता आहे.

CSAT मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यांची काठिण्य पातळी काय असते यावर विचार करा आणि त्या प्रमाणे CSAT च्या अभ्यासाचे नियोजन करा. CSAT ची तयारी सुरु करतानाच विद्यार्थी गणिताचा बागुलबुवा समोर उभा करतात आणि मग CSAT पेपर कडे बघण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक होऊन जातो. सकारात्मक पद्धतीने आणि ज्ञानावर आधारित विश्लेषणातून CSAT कडे पाहिले तर असे लक्षात येईल की आयोगाचा गणितावर फार भर नाही उलट आकलन क्षमता आणि बुद्धिमत्ता यावर अधिक भर आहे. याही घटकांवर आपण पुढील लेखांमध्ये अधिक सखोल चर्चा करणार आहोत. तूर्तास या विषयाची भीती बाळगण्यापेक्षा त्याच्या सरावावर भर द्या.

याचाच अर्थ असा कि प्रत्येक विषयानुरूप आपल्याला तयारीचा पॅटर्न बदलायला लागेल त्यावर अधिक चर्चा या नंतरच्या लेखांमध्ये आपण करणारच आहोत. हमखास यशाचा मार्ग हा योग्य विश्लेषण आणि त्यानुसार प्रयत्न याच माध्यमातून साध्य करता येतो. आपला परीक्षा पद्धतीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न असाच चालू ठेवू. तोपर्यंत प्रयत्न तुमचे अविरत चालू ठेवा…

शुभेच्छा!!

Sharing is Caring..!

हमखास यशाचा मूलमंत्र | राज्यसेवा २०१८ पूर्व परीक्षा | Blog 2

हमखास यशाचा मूलमंत्र ह्या राज्यसेवा पूर्व परीक्षेकरीता चालवत असलेल्या लेख मालेतील दुसरा लेख.

मूलतः परीक्षेचे स्वरूप आणि मागील कट ऑफ यावरून काय बोध घेता येईल याची उहापोह करणारा हा लेख.

परीक्षा पद्धती समजून घ्या

कुठलीही परीक्षा पास व्हायची असेल तर आपल्याला त्या परीक्षेचे मर्म समजून घेणे आवश्यक ठरते. अगदी मूलभूत ढाच्यापासून ते विषयांच्या विश्लेषणापर्यंत. विषयाला सुरुवात करतानाच आधी राज्यसेवा परीक्षेचा ढाचा समजून घेऊ. राज्यसेवा पूर्व परीक्षा ही दोन विषयांची बनली आहे. सामान्य ज्ञान मध्ये १०० प्रश्न आणि २०० गुण आहेत तर CSAT मध्ये ८० प्रश्न आणि २०० गुण आहेत. याचा सरळ अर्थ असा की सामान्य ज्ञान च्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ मार्क आहेत तर CSAT च्या प्रत्येक प्रश्नाला २.५ गुण आहेत. प्रत्येक प्रश्नाला निगेटिव्ह मार्कींग आहे. म्हणजेच प्रत्येक चुकीच्या उत्तराला ३३% मार्क कापले जातील. अर्थात तुमचा CSAT मध्ये एक प्रश्न चुकणं सामान्य ज्ञान मध्ये एक प्रश्न चुकण्यापेक्षा अधिक धोकादायक आहे. याची जाणीव मनात ठेवूनच आपण आपला attempt कुठल्या पेपर मध्ये नक्की किती ठेवायचा हे ठरवायला लागेल.

गेल्या वर्षी कट ऑफ किती होता? 

जो परीक्षेचा सखोल अभ्यास करतो आहे त्याला मागील काही वर्षांचा कट ऑफ काय होता हे नक्कीच माहिती माहिती पाहिजे. राज्य सेवा परीक्षेचा विचार करता मागील तीन वर्षात विविध कॅटेगरी करीता कट ऑफ खालील प्रमाणे होता.

State Services Prelims Cutoff Marks
  Category Subcategory 2015 2016 2017
Open General 125 153 189
1 Females 86 121 168
2 Sports 60 103 146
3 SC General 122 147 173
4 Females 98 135 160
5 ST General 92 119 148
6 Females 74 91 128
7 DT(A) General 109 153 180
8 NT(B) General 115 149 184
9 SBC General 106 153 182
10 NT(C ) General 125 153 189
11 NT(D) General 125 153 189
12 OBC General 125 153 189
13 Females 109 142 174
14 PH Hearing Impairment 100 125 137
15 Locomotor Disability 110 139 154

 

अर्थात यंदाच्या वर्षी आपला attempt किती असावा यासाठी नक्की एक आकडा सांगता येणार नाही. दर वर्षी एकंदर कट ऑफ वाढतो आहे. कट ऑफ वाढण्याची दोन तीन मुख्य कारणे सांगता येतील.

  • एकंदरच परीक्षेच्या तयारीसाठी उत्तम पुस्तके आणि नोटस ची उपलब्धता
  • परीक्षेमध्ये काय विचारले जाईल याचा अंदाज बांधण्यात आलेले यश
  • विद्यार्थ्यांचा योग्य सराव

अजून एक गोष्ट समजून घ्यायला हवी. प्रत्येक परीक्षेचा कट ऑफ काय असेल हे आधी सांगणे अवघड आहे. त्या वर्षी उपलब्ध असलेल्या जागा व त्यानुसार आयोगाकडून पूर्व परीक्षेतून निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या हे एक महत्वाचे परिमाण असेल. आयोगाने साधारण पणे किती विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेत उत्तीर्ण करायचे हे आधीच ठरवलेले असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच केलेल्या घोषणेप्रमाणे हा आकडा १२-१३ एकंदर रिक्त जागांच्या १२-१३ पट असतो. म्हणजे १०० जागांकरिता  १२०० ते १३०० विद्यार्थी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होतील. एकूण जागा कमी असतील तर पूर्व परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी असेल. म्हणजेच त्यावर्षी कट ऑफ जास्त भरेल. यंदा कमी पदे भरली जाणार आहेत म्हणजे कट ऑफ अधिक असण्याची शक्यता आहे. राज्य सेवा यंदाच्या जाहिराती प्रमाणे ६९ रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्थात यात आणखी काही वाढ होण्याची शक्यता आहे   म्हणजेच साधारणपणे अवघ्या १२०० – १३०० उमेदवारांना मुख्य परीक्षेत निवडले जाईल. साहजिकच यंदा कट ऑफ वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. दुसरे महत्वाचे परिमाण म्हणजे परीक्षेची काठीण्य पातळी. ती अधिक असेल तर साहजिकच कट ऑफ कमी येणार. त्यामुळे कट ऑफ अमुक इतका असेल व त्या नुसार माझा attempt अमुक इतका असावा असं गृहीत धरून विद्यार्थ्याने, परीक्षा द्यायच्या आधीच आपला attempt ठरवणं धोकादायक आहे. सचिन तेंडूलकर जसा गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटेपर्यंत कोणता फटका मारायचा हे ठरवत नसे तसाच आपणही प्रश्नपत्रिका हातात येईपर्यंत attempt ठरवू नये.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे परीक्षा सोपी आहे की अवघड हे केवळ आपल्या संदर्भामध्ये न ओळखता इतर स्पर्धकांनाही ही परीक्षा सोपी जाणार आहे की अवघड असा विचार विद्यार्थ्याने करायला हवा. त्यामुळे आपली कामगिरी इतर स्पर्धकांच्या तुलनेत कशी आहे / असेल याचा विचार कायम करत रहाणं विद्यार्थ्यांनी शिकायला हवं. त्यासाठी सराव परीक्षांमध्ये आपल्या कामगिरीचे मूल्यमापन इतरांच्या तुलनेत कसे आहे हे ही तपासून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केवळ वैयक्तिक पातळीवर अभ्यास करून पूर्ण होत नाही.

या बरोबरच इतर अनुभवी स्पर्धक बाजारात उपलब्ध असलेली पुस्तके, सराव परीक्षा यांचा आणि सुयोग्य तंत्राचा वापर करून आपली कामगिरी सुधारत असल्याचे लक्षात घ्यावे लागेल. टी २०  च्या उदयानंतर अनेक खेळाडूंना आपणही प्रसंगी ७-८ च नव्हे तर १० च्या रन रेट ने ही फलंदाजी करू शकतो याचे भान दिले. तसच अनुभवातून शिकणारे विद्यार्थी आपली कामगिरी सुधारत नेत एकंदर कट ऑफ वाढवत नेत असतात याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. स्वाभाविक स्पर्धेचं योग्य भान तुम्हाला अधिक चांगला उमेदवार बनवतं.

केवळ परीक्षार्थी न रहाता तंत्र आणि अभ्यास यात मेल साधत यशाचा मार्ग शोधायचा आपण प्रयत्न करतोय. या लेखमालेतून या संदर्भात अधिकाधिक चर्चा करीत राहू.

भावी यशासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

Sharing is Caring..!

हमखास यशाचा मूलमंत्र | राज्यसेवा २०१८ पूर्व परीक्षा | Blog 1

नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. एकूण ६९ पदांकरिता ही परीक्षा होईल. २९ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज  दाखल करता येतील. राज्यसेवा पूर्व परीक्षा यंदा ८ एप्रिल २०१८ ला होणार आहे. स्वाभाविकच जे अधिक जबाबदारीने आणि आधी पासून तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांकरिता अक्षरशः युद्धाचे पडघम वाजायला सुरुवात झालीये. योग्य स्ट्रॅटेजी, भरपूर अभ्यास, जोडीला स्मार्ट वर्क आणि योग्य सराव या चार सूत्रांवरच यशाचे मजले उभे राहू शकतात. परीक्षा पास होण्यासाठी काय करायला पाहिजे याचा आधी विचार करूयात.

भूतकाळापासून बोध घ्या

सर्वप्रथम आपल्या भूतकाळापासून शिका परंतु त्यात अडकून राहू नका. विशेषतः जे पहिल्या प्रयत्नात यश मिळवू शकत नाहीत त्यांनी आपल्या मागच्या प्रयत्नांकडे डोळसपणे बघा. त्या वेळेस कोणत्या चुका झाल्या त्या या वर्षी परत होणार नाहीत याची काळजी घ्या.  गेल्या प्रयत्नात आपण सामान्य ज्ञान आणि CSAT या दोन्ही भागातून किती मार्क मिळवले याचे विश्लेषण करा. या दोन्ही घटकातून तुम्हाला  कोणत्या उपघटकातून कमी मार्क मिळालेत याचंही विश्लेषण करा.

आपले कोणते प्रश्न गेल्या वेळेस चुकलेत? ते का चुकले याचंही विश्लेषण करणं गरजेचं आहे. जे प्रश्न चुकले त्यात आपण अभ्यास केलेले परंतु ऐनवेळेस आठवले नाहीत असे प्रश्न असतील तर आपल्या अभ्यासाच्या प्रक्रियेतच काही चुका होतायत. सामान्यपणे अशावेळी दोन – तीन  प्रतिक्रिया स्वाभाविकपणे समोर येतात.

एक म्हणजे सगळा दोष आयोगावर टाकण्याचा प्रयत्न होतो. MPSC काहीही प्रश्न विचारते! अशा प्रश्नांची उत्तरे कुणालाच येणार नाहीत वगैरे वगैरे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये १० टक्के तरी निदान असे प्रश्न असतातच ज्यांची उत्तरं कुणालाच येत नसतात. परंतु अवघड वाटलेला प्रत्येक प्रश्न या कॅटेगरीत टाकणं चुकीचं. विद्यार्थी आयोगाचीच अक्कल काढायला  लागतात. परंतु असे करून आपला काहीही फायदा होत नाही.

दुसरी प्रतिक्रिया असते म्हणजे थोडक्यात चुकलंय, नाहीतर आलंच  असतं. अशावेळेस थोडक्यात चुकलंय पासून १००% बरोबर आहे पर्यंतचा प्रवास आपल्याला निदान या वर्षी तरी करायलाच हवा. त्यासाठी काही गोष्टी तपासून पहा.

१. ज्या पुस्तकांचा / अथवा नोट्स चा वापर करताय त्यात प्रश्नात अपेक्षित असलेली माहिती आहे ना?

२. आपली रिव्हिजन योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात होते का?

३. आपली अभ्यास पद्धती परीक्षेला पूरक आहे ना?

४. आपला प्रश्न सोडविण्याचा सराव योग्य प्रमाणात आहे ना?

या चारही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील याची काळजी घ्या.

हे विश्लेषण करताना सामान्यपणे आपला फोकस जे आलं नाही याकडेच राहतो आणि जे आले नाही त्यावर अधिकाधिक मेहनत करण्याकडे कल असतो. पण आपली बलस्थानं ओळखून त्याच्या आधारावर सुध्दा यश मिळविता येऊ शकतं. अर्थात त्यासाठी मागील परीक्षेतील आपल्या परफॉर्मन्सचं  सुयोग्य विश्लेषण आवश्यक ठरेल.   आपली बलस्थानं सुरक्षित करून घेतलीत तर त्यातून आलेले प्रश्न हातून सुटणार नाहीत आणि निगेटिव्ह मार्कींगचा फटका बसणार नाही. आपल्या अभ्यासातले जे कच्चे दुवे आहेत त्यांना बळकट करून निदान त्यात सरासरी गुण पडतील याची काळजी घ्या.   Make your strong points strongest and weak points average!

स्पर्धापरीक्षेतील मागील अपयश हे पुढील यशाची पायरी बनायची असेल तर आपला भूतकाळ हा पायरीच्या दगडा प्रमाणे वापरायला हवा. म्हणून जिथे अडलो तिथे गांगरून जाऊन / घाबरून थांबू नका तर पुढे जाण्याचे मार्ग शोधा. यशाचा राजमार्ग त्यातच दडलेला असेल.

यश मिळविण्यासाठी काय करायचेय यावर ही चर्चा अशीच चालू ठेवू तोवर तुमच्या अभ्यासास योग्य दिशा मिळो हीच सदिच्छा!

All the best!!

Sharing is Caring..!

© 2018 Blog